प्रेमाचा धागा तोडु नका

     संध्याकाळची वेळ होती. अचानक आभाळ दातुन आले आणि जोरदार वारा वाहायला लागला . पाऊस देखील पडायला लागला. त्या जोरदार सुसाट वार्‍यामुळे विज कनेक्शन तुटून पडलं. लाईट येण्याची मुळीच शक्यता नव्हती. आजुबाजूला सगळ्यांकडे दिवेपणत्या मेणबत्या जळत होत्या. आमच्या घरी सुध्दा दिवे जळत होते. पण ते इनव्हरर्टवर जळत होते. आता ते इनव्हर्टर काही कालावधी नंतर ट्रीप होऊन बंद पडणार होते आणि घरभर अंधार होणार होता. मग माझे पती म्हणाले, अग! तो हॉल मधला लाईट बंद कर. बेडरुम मधील छोटा लाईट  लाव”. टी. व्ही देखिल बंद कर. मी बंद केले. जवळजवळ सर्व मोठे लाईट बंद करुन आणि छोटा लाईट लाऊन आम्ही अंगणामध्ये येऊन बसलो. अंगणामध्ये स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडला होता. कधी नव्हे ती विजेची बचत करत होतो.
      मनामध्ये विचार आला की, शासन एवढे ओरडूओरडू सांगते की, विजेची बचत करा, विजेची बचत करा! तेव्हा मात्र कुणालाच रस वाटत नाही. परंतु आज जेव्हा रात्रभर लाईट येणार नाही आहे याची आम्हाला स्पष्ट जाणीव झाली, तेव्हा आम्हाला कुणीही सांगीतले नसतांना आम्ही विजेची बचत करतोय आणि ती ही थोडी थोड्की नव्हे तर घरामधले सर्व लाईट बंद करुन. तो पर्यंत जो पर्यंत गप्पा मारायच्या आहेत किंवा झोपण्याची वेळ व्हायची आहे. त्या वेळेपर्यंत अंगणामध्ये स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये येऊन बसलो आहोत .
     पुन्हा माझ्या डोक्यामध्ये विचार आला की, असे का व्हावे? याच कारण म्हणजे जेव्हा एखादी वस्तू मुबलक असते तेव्हा तिची आपल्याला किंमत वाटत नसते, परंतु आता विज ही मर्यादीत आहे. इनव्हरर्टच्या बॅटरीमध्ये विज साठविलेली आहे. तेवढी विज पुरवायची असेच आहे. याची आम्हाला जाणीव झाली आणि म्हणुनच तिची आम्हाला किंमत वाटते. पाण्याचेही असेच आहे, एरवी खुप सारे पाणी वाह्त अस्ते परंतु जेव्हा आपल्याला माहित होतं की दोन दिवस नळ येणार नाहीच. तेव्हा मात्र पाण्याच्या थेंबा-थेंबाचा हिशेब आम्ही ठेवतो .
      आयुष्यामध्ये प्रेमाचे तरी काय वेगळे आहे? जेव्हा प्रेमाचा अमर्यात वर्षाव होतो तेव्हाच आम्हाला त्या प्रेमाची किंमत कळत नसते . परंतु प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती जेव्हा दूर जाते तेव्हा मात्र त्या व्यक्तीकडून मिळणार्‍या प्रेमाची खरी किंमत कळायला लागते . कारण तेव्हा तिच्याकडून मिळणारे प्रेम बंद झालेल असते. ती व्यक्ती दूर गेलेली असते. आयुष्यामध्ये जर प्रेम टिकुन ठेवायचे असेल, तर वेळीच त्याची किंमत ओळखली पाहीजे. त्याला योग्य तो आदर सन्मान द्यायला शिकल पाहिजे. अन्यथा तो प्रेमाचा स्त्रोत कधी दुर होईल? कधी दुअरावेल? हे सांगता येत नाही . विजेचे तुटलेले कनेक्शन जोडता येईल. खंडीत झालेला विजपुरवठा पुर्ववत सुरु होईल. परंतु प्रेमाचा  स्त्रोत जर खंडीत झाला किंवा दुरावला, तर तो जोडणे कठीणच. हे विचारात घेवूनच एका सुफी संताने कदाचीत खालील ओळी रचल्या असाव्यात .

रहिमन धागा प्रेमका, मत तोडो चटकाय!
टुटे पर ना जुडे, जुडे तो गाठ पड जाय!!